निधी वाया जाण्याची नगरसेवकांना भीती
पालिका प्रशासनाने सुमारे १२२ कनिष्ठ अभियंत्यांना अलीकडेच एकगठ्ठा पदोन्नती दिल्यामुळे विविध विभागांमध्ये मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला आहे. कनिष्ठ अभियंत्यांअभावी अनेक कामे रखडू लागली आहेत. परिणामी नगरसेवक निधी, प्रभाग निधीमधून केली जाणारी असंख्य नागरी कामे खोळंबली असून ई-निविदा प्रक्रियाही थंडावली आहे. कनिष्ठ अभियंत्याअभावी कामे रखडून निधी वाया जाण्याच्या भीतीने नगरसेवकांना ग्रासले आहे.
आपापल्या प्रभागांमधील छोटी-मोठी नागरी कामे करता यावीत यासाठी नगरसेवकांना ६० लाख रुपये नगरसेवक निधी आणि एक कोटी रुपये प्रभाग निधी देण्यात आला आहे. तसेच काही कामांसाठी विशेष निधीही दिला जातो. या निधीमधून पेवरब्लॉक बसविणे, गटाराची दुरुस्ती करणे, फरसबंदी करणे, गटारांची झाकणे बसविणे, पायवाटेची दुरुस्ती आदी प्रकारची कामे नगरसेवक आपापल्या प्रभागांमध्ये गरजेनुसार करीत असतात. एखादे काम करण्यासाठी नगरसेवक पालिका विभाग कार्यालयात पत्र देतात. पत्र मिळाल्यानंतर कनिष्ठ अभियंते सूचित केलेल्या कामाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करतात, तसेच मोजमापेही घेतात. त्यानंतर संबंधित कामाचे अंदाजपत्र तयार करण्यात येते आणि महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या प्रभाग समितीच्या बैठकीत त्या कामाच्या प्रस्तावाला मंजुरी घेतली जाते. ई-निविदा प्रक्रियेत निविदा मागवून कंत्राटदाराला काम दिले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया दोन-तीन महिन्यांमध्ये पार पाडल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होते. काही वेळा ही प्रक्रिया दीर्घकाळही चालते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत पालिकेच्या परिरक्षण विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
महापालिकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंत्यांची सुमारे एक हजार पदे असून त्यापैकी ३५० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये परिरक्षण विभागातील २७० पदांचा समावेश आहे. त्यामुळे मुळातच परिरक्षण विभागात कनिष्ठ अभियंत्यांचा तुटवडा आहे. वेळोवेळी पदोन्नती न देणे ही प्रथाच महापालिकेत पडली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून १२२ कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती रखडली होती. प्रशासनाने तत्परता दाखवत अलीकडेच १२२ जणांना पदोन्नती देऊन उपअभियंता पदावर विराजमान केले. त्यामुळे आधीच संख्येने कमी असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांमध्ये तूट निर्माण झाली.
त्यामुळे नगरसेवकांनी पत्र देऊन सुचविलेल्या कामाची पाहणी करणे, मोजमापे घेणे, अंदाजपत्र तयार करणे आदी कामे रखडली आहेत. नगरसेवकांचा सुमारे ५० टक्के निधी शिल्लक असून मार्चपर्यंत न वापरल्यास वाया जाण्याची शक्यता आहे. अनेक नगरसेवक पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये कामांसाठी पत्र पाठवत आहेत. परंतु कनिष्ठ अभियंते नसल्याचे कारण पुढे करीत नगरसेवकांची पत्रे धूळखात पडली आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ कामामुळे नागरी कामे रखडून निधी वाया जाण्याची दाट शक्यता आहे.