बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेश माने यांना महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून दूर केल्यामुळे नाराज झालेल्या काही जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांनी राजीमाने दिले आहेत.  त्यामुळे राज्यातील नेतृत्व संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरेश माने यांच्यावर राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, मात्र ११ एप्रिल रोजी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचे प्रभारीपद काढून घेतले. त्यामुळे माने यांनी केरळ, आंध्र प्रदेश व तेलंगणाच्या प्रभारीपदावरून मुक्त करावे, अशी विनंती मायावती यांना केली आहे. माने यांच्या या बंडाच्या पवित्र्यामुळे राज्यात बसप फुटीच्या उंबरठय़ावर उभी असल्याचे मानले जात आहे.
राज्यभरातील बसपमधील माने समर्थकही एकवटू लागले आहेत.  पक्षाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष मनोज बनसोड व अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या पंधरा ते अठरा वर्षांपासून पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळणारे मोसिन खान, अ‍ॅड. नरेश शेंडे, विलास राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदमुक्त झाले आहेत. वाशिम जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. जिल्ह्य़ातील जवळपास ९५ टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस प्रवीण इंगळे यांनी दिली. बीड जिल्ह्य़ामध्येही नाराजी आहे, असे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वजित बनसोडे यांनी सांगितले. भंडारा येथे शनिवारी पक्षातील दोन गटांत हमरीतुमरी झाली.