आता शहरातील गाडय़ांना रस्ता अपुरा पडत असला तरी काही दशकांपूर्वी चार चाकी गाडय़ा पाहण्यासाठी लोक आवर्जून रस्त्याच्या बाजूला उभे राहत. आता प्रत्येक घरात गाडी येऊ लागली असली तरी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रस्त्यावर हुकमत गाजवणाऱ्या या राजेशाही गाडय़ांचा देखणेपणा व आब अजूनही कायम आहे. याचा प्रत्यय आला तो अत्यंत दुर्मीळ कार, बाइक आणि स्कूटर यांचा समावेश असलेल्या ‘व्हिण्टेज कार फिएस्टा २०१७’ या कार्यक्रमादरम्यान. रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या गाडय़ांच्या प्रदर्शन व रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘व्हिण्टेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ’ आणि ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे हॉर्निमन सर्कल, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहा’चे अध्यक्ष विवेक गोएंका यांनी झेंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली. या वेळी पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित होत्या.

‘व्हिण्टेज कार फिएस्टा २०१७’ कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अत्यंत दुर्मीळ चार चाकी व दुचाकी वाहने सहभागी झाली होती. गोल दिव्यांची आणि हिरव्या, निळ्या, लाल रंगांची ही जुनी वाहने फोर्ट येथील हॉर्निमन सर्कल येथे गोलाकार जागेत उभी राहिली होती. त्यामुळे दक्षिण मुंबईतील या परिसराला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्याचा भास होत होता.

रॅलीमध्ये उत्तम सहभागाबद्दल ऋषी गांधी यांच्या १९४७ सालच्या सिट्रॉन या गाडीला पारितोषिक मिळाले. या वेळी मुंबईत जुन्या दुर्मीळ गाडय़ांचे संग्रहालय असावे अशी आमची मागणी आहे, असे ‘व्हिण्टेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन डोसा यांनी माहिती देताना सांगितले.

‘रोल्स रॉईस’ला पारितोषिक

या स्पर्धेत विविध गट करण्यात आले होते. त्यापैकी १९४० पूर्वीच्या वाहनांच्या गटात, ‘इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहा’चे अध्यक्ष विवेक गोएंका यांच्या १९३० सालची निर्मिती असलेल्या ‘रोल्स रॉईस’ या गाडीला स्मृतिचिन्ह स्वरूपात पारितोषिक मिळाले. तर १९५८ सालातील निर्मिती असलेल्या ‘ब्यूक’ या त्यांच्याच गाडीला स्मृतिचिन्ह स्वरूपातील पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक १९४१ ते १९६० दरम्यानच्या वाहनांसाठीच्या गटासाठी होते.

रॅलीचे आयोजन

रोल्स रॉईस, फोर्ड, डेमलर, ब्यूक, ऑस्टिन, बेंटले आदी कंपन्यांच्या जवळपास २२० गाडय़ा या प्रदर्शन व रॅली स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तसेच यात बुलेट, वेस्पा स्कूटर यांसारख्या जुन्या ६० दुचाकींचाही समावेश होता. या रॅलीचे हॉíनमन सर्कल ते बांद्रा-कुर्ला संकुल येथील हॉटेल सॉफिटलपर्यंत आयोजन करण्यात आले होते.