शास्त्रीय संगीत हा विचार आहे, तो समजून घेण्यासाठीही विचारांची गरज आहे. तो एक आत्मशोध आहे..असा विचार मांडत विख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी सोमवारी एका सुरेल मैफलीत आपला सांगीतिक प्रवास रसिकांच्या उदंड गर्दीत उलगडला. या प्रवासातले टप्पे सांगताना त्यांच्या शब्दांतून बाहेर पडणाऱ्या विचारांना सुरेल स्वरांची साथ मिळाली आणि उपस्थितांनी मंत्रमुग्ध होत त्या सुरेलतेला उत्स्फूर्त टाळी दिली. निमित्त होते ‘लोकसत्ता’च्या व्हिवा उपक्रमांतर्गत मासिक मनमोकळय़ा चर्चासत्राचे.‘व्हिवा लाऊंज’च्या सेलिब्रिटी संपादिका व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आरतीताईंशी संवाद साधला.
तानपुरे जुळवून देईपर्यंत गायकाला जी कलासक्तउसंत द्यावी लागते ती दिल्यानंतर उपस्थित श्रोत्यांनी आपल्या आवडत्या गायिकेला आपल्या प्रश्नांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घर आणि गाणं दोन्ही कसं सांभाळता येथपासून ते घराणं बदललं की गळय़ावरचं गाणंही बदलावं लागतं का येथपर्यंत विविध मुद्दय़ांवर श्रोत्यांनी आरतीताईंचे विचार जाणून घेतले. या विचारांची सुसंगत मांडणी करताना शब्द जिथे थांबत तिथे आरतीताई सहज सुराची साथ घेत आणि समोर येत असे एक विलक्षण अनुभव. कलानिर्मितीचे मर्म उलगडून दाखवणाऱ्या या कलात्मक क्षणास अनेक वेळा दाद देण्याशिवाय उपस्थितांना पर्याय राहिला नाही. सरदारी बेगममधील,‘चली पीने नगर’ ही आर्त रचना असो वा अशोक पत्की यांच्या दिग्दर्शनाखालील ठुमरी अंगाने जाणारे गीत असो, आरतीताईंनी तितक्याच उत्साहाने त्याचे सादरीकरण केले आणि उपस्थित त्यांचा दमसास आणि वैविध्य यामुळे भारावून गेले.
शास्त्रीय संगीत शाळा,महाविद्यालयांत नको
शास्त्रीय संगीत ही ‘आम’ लोकांसाठीची गोष्ट नाही. ती ‘खास’ आणि दर्दी लोकांसाठीची गोष्ट आहे. शंभर मुलांपैकी एखादाच शास्त्रीय संगीत शिकू शकतो. ही काही घाऊक शिकविण्याची गोष्ट नाही. त्यासाठी शिकणाऱ्याचीही तयारी लागते. त्यामुळे शास्त्रीय संगीत हे गुरुकुल पद्धतीनेच शिकविले गेले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांत शिकवली जाणारी ही गोष्ट नाही, आरतीताईंनी सांगितले.
अनेकांसाठी संगीत हा मनोरंजनाचा प्रकार असतो. जे गीत किंवा संगीत ऐकून मनोरंजन होते, तेच जास्त ऐकले जाते. मात्र, शास्त्रीय संगीतासाठी श्रोत्यांच्या संख्येपेक्षाही गुणवत्ता महत्त्वाची असते. केवळ काही सुरांच्या आधारे शास्त्रीय संगीतातून आत्मिक शांतीची अनुभूती मिळते. त्या अर्थाने शास्त्रीय संगीत हे मनोरंजन नव्हे, तो एक आत्मशोध आहे
आरती अंकलीकर-टिकेकर
या सुरेल मैफिलीचा सविस्तर वृत्तांत लवकरच ‘व्हिवा’ पुरवणीत