गोरेगावातील आरे कॉलनीत ‘आपली भाजी, आपला मळा’चा अनोखा उपक्रम

रेल्वेस्थानकांशेजारी किंवा नाल्याशेजारी पिकवलेल्या सडक्या भाज्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी गोरेगावच्या आरे कॉलनीत ‘आपली भाजी, आपला मळा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यामुळे मुंबईकरांच्या ताटात मळ्यातली ताजी भाजी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईकरांना आपल्या दारात स्वस्त आणि ताजी भाजी मिळावी यासाठी अनेक भागात शेतकऱ्यांचा आठवडी बाजार सुरू करण्यात आला. याचप्रमाणे, याच धर्तीवर डॉक्टर चिन्मय बाळ यांनी मुंबईकरांना स्वच्छ, ताजी आणि स्वस्त भाजी मिळावी यासाठी दर रविवारी गोरेगावातील आरे कॉलनीत मुंबईकरांसाठी ‘आपली भाजी.. आपला मळा’ हा उपक्रम राबवला आहे.

सकाळी आरे कॉलनीत मोठय़ा प्रमाणात मुंबईकर चालण्याकरिता येतात. व्यायाम केल्यानंतर घरी जाताना ताजी भाजी घेऊन जाता यावी, यासाठी सकाळी ६ वाजता या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळा सुरू असतो. पहाटे चार वाजता नाशिक येथून कोबी, कांदा, बटाटा, फ्लॉवर अशा सर्व भाज्या येथे आणल्या जातात. चिन्मय यांचे वडील विलास बाळ यांचा गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांशी दांडगा संपर्क असल्याने ते थेट नाशिकहून भाजी मागवितात. आरे कॉलनीत हे केंद्र गेल्या रविवारी सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी येथे एक टन भाजी अवघ्या ४ तासांत संपली. त्यामुळे याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना झाल्याचे डॉ. चिन्मय बाळ यांनी सांगितले. भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या १० जणांनी आमच्या इमारतीच्या संकुलातही अशा प्रकारचा उपक्रम राबवावा, असे सुचविले आहे.

भाजीसोबत निर्माल्यापासून खतनिर्मिती

मुंबईकरांचे आरोग्य सुधारावे आणि डॉक्टरांकडे लागणाऱ्या रांगा कमी व्हाव्या यासाठी आम्ही ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. जर इतर ठिकाणी असे उपक्रम सुरू  झाले तर शेतकऱ्यांनाही याचा चांगला फायदा होईल. ही भाजी स्वच्छ-ताजी आहेच आणि बाजारभावापेक्षा स्वस्तही आहे. येथे गांडूळ खत प्रकल्प सुरू असल्याने येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही येताना घरातील निर्माल्य घेऊन येण्यास सांगतो. यातून खत तयार होण्यास मदत होईल. – विलास गणेश बाळ

माहिती झाली की..

सुरुवातीला ग्राहकांना या उपक्रमाबाबत माहिती नव्हती. तरी पहिल्याच दिवशी बऱ्यापैकी माल विकला गेला आहे. ग्राहकांना याची माहिती मिळाल्यानंतर यात नक्कीच वाढ होईल.

– बळीराम भदाने, संचालक, देवळा ‘अ‍ॅग्रो प्रोडय़ुसर’ कंपनी