दोन आठवडय़ांपूर्वी वाजतगाजत सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला दिवाळीच्या सुट्टय़ांचा ब्रेक लागल्यावर पालिका आता पुन्हा एकदा रुळावर येत आहे. दर शनिवारी सकाळी दोन तास शहराच्या २२७ प्रभागांमध्ये एकाच वेळी सुरू होणाऱ्या स्वच्छता अभियानासाठी गर्दी तसेच पर्यटनस्थळांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या हाकेनंतर मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबईचा वसा हाती घेतला आहे. दर शनिवारी स्थानिकांच्या मदतीने सकाळी ११ ते १ या वेळेत स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेत कोणालाही सहभागी होता येते. २२७ नगरसेवकांच्या प्रभागात एकाच वेळी करण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहीमेत गर्दीची तसेच पर्यटनाची स्थळे प्राधान्याने निवडली जातील, असे अतिरिक्त आयुक्त विकास खारगे यांनी स्थायी समितीत सांगितले. त्यामुळे अधिकाधिक लोकापर्यंत ही मोहीम पोहोचून त्यांनाही या मोहिमेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळू शकेल. २२७ ठिकाणांची यादी महानगरपालिकेच्या वेबसाइटवर आधीच लावण्यात येईल. पालिकेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार स्थायी समिती सदस्यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडूनही स्वच्छतेसाठी अधिक तत्परतेने काम होण्याची अपेक्षा सदस्यांनी मांडली.