कचरा करणाऱ्यांना सांताक्लॉजकडून भेट; दुष्परिणामांची माहिती देत जनजागृती

कचरा करणाऱ्यावर क्लिन अप मार्शलमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी मुंबई बकाल करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे नाताळचे औचित्य साधून पालिकेने क्लिन अप मार्शलच्या माध्यमातून कचरा करणाऱ्या मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कचरा करणाऱ्यांना दंड करण्याऐवजी सांताक्लॉजच्या हस्ते चॉकलेट देऊन कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत पालिकेने गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.

मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी क्लिन अप मार्शलची नियुक्ती केली होती. मात्र क्लिन अप मार्शलबद्दल तक्रारी वाढू लागल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. मात्र बेशिस्त मुंबईकर मोठय़ा प्रमाणावर मुंबई अस्वच्छ करीत असल्यामुळे पुन्हा एकदा क्लिन अप मार्शलची फौज तैनात करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करूनही मुंबईकरांमध्ये सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी उघडय़ावरच लघुशंका, प्रात:विधी उरकण्यात येत आहेत. तसेच पान खाऊन भिंतीवर पिचकाऱ्या मारल्या जात आहे. स्त्यावर कचरा फेकला जात आहे.त्यामुळे  क्लिन अप मार्शल योजना पुन्हा सुरू केली.

कचरा करणाऱ्यांवर शनिवार आणि रविवारी दंडात्मक कारवाई करायची नाही. कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती देत त्यांच्यामध्ये जनजागृती करायची, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. कचरा टाकणारी व्यक्ती दिसल्यास सांताक्लॉजमार्फत त्याच्या हाती चॉकलेट देत त्याची समजूत काढण्याचे ठरविले आहे. शनिवारी मुंबईत अनेक ठिकाणी सांताक्लॉज कचरा करणाऱ्यांचा शोध घेत फिरत होते.

  • एखाद्याने कचरा टाकल्याचे दिसताच त्याच्या हातावर चॉकलेट ठेवून त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते.
  • एरवी दंडात्मक कारवाई करणाऱ्या क्लिन अप मार्शलशी हुज्जत घालणारी ही मंडळी सांताक्लॉजच्या भेटीनंतर चूक झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
  • काही ठिकाणी सांताक्लॉजच्या वेशातील पालिका कर्मचाऱ्यांनी रॅली काढून स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
  • तसेच काही शाळा परिसरात भेट देऊन सांताक्लॉजच्या वेशातील पालिका कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
  • एल्फिन्स्टन, परळ आदी भागांमध्ये ३० डिसेंबपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.