मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या आग्रहामुळे निकाल लांबणीवर पडले असताना या मूल्यांकनावरूनही नवा वाद निर्माण होण्याचे संकेत आहेत. काही नामांकित महाविद्यालयांतील ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना केवळ १५-२० गुण मिळाल्याचे उघडकीस आले आहे. केवळ पुरवण्यांचे मूल्यांकन करुन गुण दिल्याने हे विद्यार्थी नापास झाल्याचा दावा महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून केला जात आहे.

विद्यापीठाने घाईघाईत उरकलेल्या ऑनलाइन मूल्यांकनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तांत्रिक घोळ निर्माण झाल्याची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. मिठीबाई महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील एक विद्यार्थी आत्तापर्यंत महाविद्यालयामध्ये नेहमीच प्रथम क्रमांक पटकावत आला आहे. मात्र, सहाव्या सत्रातील परीक्षेतील एका विषयात त्याला केवळ १७ गुण प्राप्त झाल्याचे निकालामध्ये दाखविण्यात आले आहे. तर रुईया महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील हुशार विद्यार्थ्यांला पाचव्या सत्रामध्ये केवळ १४ गुण प्राप्त झाल्याचे निकालामध्ये दिसत आहे.

निकालांच्या गोंधळामुळे नेहमी ९० टक्क्य़ांच्या आसपास गुण मिळवून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी नुकत्याच जाहीर झालेल्या विज्ञान शाखेच्या निकालामध्ये नापास झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या केवळ पुरवण्यांचे मूल्यांकन करुन गुण दिले असल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये संपर्क करुन संबंधित प्रकार त्यांच्या नजरेस आणून दिला आहे. हा तांत्रिक घोळ सोमवापर्यंत सोडविला जाण्याचे आश्वासन परीक्षा विभागातून देण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून देण्यात आली.

निकालाबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी अनेक विद्यार्थी शनिवारी मदत केंद्रांवर गेले होते. परंतु, दिवसभरात मदत केंद्रे बंद असल्यामुळे त्यांना कोणतेच उत्तर मिळू शकलेले नाही.

३२८ निकाल जाहीर

शनिवारी विद्यापिठाकडून ५ निकाल जाहीर करण्यात आले. आतापर्यंत एकूण ३२८ निकाल जाहीर झाले आहेत.  उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेगाने सुरू आहे. जन्माष्टमी, पारसी नवीन वर्ष आणि १५ ऑगस्ट या जोडून आलेल्या सुट्टयांमध्येही मूल्यांकनाचे काम सुरु राहणार आहे, असे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे यांनी सांगितले.