म्हाडाकडे पुन्हा छायाचित्र सादर करण्याची अर्जदारांना सूचना
स्मार्ट भ्रमणध्वनीवरील जीवघेणा ठरणारा ‘सेल्फी’ आता ‘म्हाडा’ घरांच्या सोडतीसाठीही घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी घातक ठरला आहे. ‘म्हाडा’ घरांच्या सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी आपला अर्ज प्राणी, पक्षी, पर्यटन स्थळे किंवा समूहातील ‘सेल्फी’सह सादर केला आहे, अशा अर्जदारांना पुन्हा नव्याने छायाचित्र सादर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ठाणे, मीरा रोड आदी ठिकाणी ४ हजार २७५ घरांसाठी ‘म्हाडा’ने सोडत जाहीर केली असून त्यासाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ९० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.‘सेल्फी’मध्ये त्या एकटय़ा व्यक्तीचे छायाचित्र व्यवस्थित आणि सुस्पष्ट असेल तर ते ‘सेल्फी’ विचारात घेतले जातात. मात्र समूहामधील, प्राणी/पक्षी यांच्यासोबतचे किंवा अन्य ठिकाणी काढण्यात आलेले ‘सेल्फी’ विचारात घेतले जात नसल्याचे ‘म्हाडा’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या वेळी काढण्यात आलेल्या सोडतीच्या वेळीही अनेकांनी घरातील पाळीव प्राणी, देव, पर्यटन स्थळे येथे काढलेली ‘सेल्फी’ अर्जासोबत जोडले होते. यंदाही तसाच प्रकार घडला आहे. छायचित्र चुकीच्या पद्धतीने पाठविलेले असेल किंवा योग्य रेझ्युलेशनमधील नसेल तर संबंधितांना लघुसंदेश किंवा ई-मेलद्वारे छायचित्र चुकीचे असल्याचा संदेश पाठविला जातो आणि योग्य छायाचित्र विहित मुदतीत पाठविण्यास सांगितले जाते. यंदाच्या सोडतीसाठीही ज्यांच्या अर्जासोबत छायाचित्र चुकीचे जोडले गेले आहे, त्यांनाही कळविण्यात आले असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली.
दोन हजार अर्ज सेल्फीसह
दोन हजारांहून अधिक अर्जासोबत असे ‘सेल्फी’ जोडण्यात आले आहेत.गेल्या वेळी काढण्यात आलेल्या सोडतीच्या वेळीही अनेकांनी ‘सेल्फी’ अर्जासोबत जोडले होते.