सध्या सुरू असलेला उन सावलीचा खेळ आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. अरबी समुद्रावरून येणारे पश्चिमेचे जोरदार वारे आणि पूर्व व ईशान्येकडून येणारे वारे एकमेकांना छेदत असून दक्षिण कर्नाटकापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा द्रोण तयार झाला आहे. या द्रोणामुळे या भागात ढग जमा होत असून सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. याचाच परिणाम मुंबईतही दिसून असून आणखी दोन दिवस वातावरण ढगाळ राहील.
भर उन्हाळ्यात मध्य महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाचे अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी वेधशाळेतील अधिकाऱ्यांच्या मते दरवर्षी कमीअधिक प्रमाणात या काळात पाऊस पडतो. उन्हाळा सुरू झाल्यावर वाऱ्याची दिशा बदलते. सुरुवातीला पश्चिमेकडून व नंतर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांसोबत समुद्रातील बाष्पही असते. त्यामुळे या काळात अधूनमधून ढगाळ वातावरण असते, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. एप्रिल महिन्यात सरासरी तापमान ३३ अंश से. असते. एप्रिलमध्ये समुद्रावरून वारे सुटत असल्याने तापमान कमी असते. मात्र यावेळी या वाऱ्यांचा वेग अधिक आहे. त्याचवेळी जमिनीवरून येणारे वारे हे पूर्वेकडून येताता. हे वारेही सध्या ईशान्येकडून येत असून त्यांचा वेग कमी आहे. या दोन्ही घटकांच्या एकंदरित परिणामामुळे सरासरी कमाल तापमान एक ते दोन अंश से.ने कमी दिसत आहे.