ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार आणि माहिती व संशोधनपूर्ण लिखाण करणारा अभ्यासक गमाविला असल्याची शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पत्रकारितेतील प्रखर बुद्धीवादाचे पुरस्कर्ते असणारे डॉ. टिकेकर हे चौफेर प्रतिभेचे व्यक्तिमत्व होते. आपल्या सव्यसाची लिखाणाने त्यांनी संपादक पदाला एक उंची प्राप्त करून दिली होती. ते एक अभिजात ग्रंथप्रेमी होते. आधुनिक महाराष्ट्र, मुंबई विद्यापीठ, टाइम्स ऑफ इंडिया आदीबाबतचे त्यांचे इतिहास लेखन त्यांच्यातील संशोधक व चिकित्सक इतिहासकाराची प्रचिती देणारे आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील एक श्रेष्ठ दर्जाचा संपादक आपण गमाविला आहे.

सामाजिक बदलांना लेखणीतून अधोरेखित करणारे व्यासंगी पत्रकार हरपले – विनोद तावडे
ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांनी नेहमीच वेळोवेळी होत असलेल्या सामाजिक बदलांना आपल्या लेखणीतून अधोरेखित केले. पत्रकारितेची मूल्ये जपणारे आणि लेखणीच्या माध्यामातून वेगवेगळे प्रश्न मांडणारा व्यासंगी, अभ्यासू पत्रकार हरपल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
पत्रकार ते कल्पक संपादक म्हणून काम करणाऱ्या टिकेकर यांची नाळ कायमच सर्वसामान्यांशी जोडलेली राहिली. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सामान्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखणीने नेहमीच केला आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही माहित असलेले संपादक असे त्यांचे नाव झाले. टिकेकर यांचे पत्रकारितेतील योगदान अत्यंत महत्वाचे असून लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या पत्रकारितेचे नवीन मापदंड टिकेकर यांनी निर्माण केले. टिकेकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील मूल्य जपणारा पत्रकार हरपला असल्याचेही तावडे यांनी आपलया शोकसंदेशात म्हटले आहे.