मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी दिलेले १५ दिवसांचे अल्टिमेटम शनिवारी संपुष्टात आले. त्यानंतर आज सकाळपासूनच मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना हटवण्यासाठी आक्रमक झाले आहेत. ठाणे, कल्याण, वसई आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांच्या परिसरात अवैधपणे स्टॉल आणि बाकडे मांडणाऱ्या फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले. यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी सरकारला जबाबदार धरत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे.

राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला चर्चगेट येथील सभेत फेरीवाल्यांना हटवण्याची धमकी दिली. मात्र, गेल्या १५ दिवसांत त्यांच्याविरुद्ध सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात बांगड्या भरून बसले आहेत का?, असा बोचरा सवाल निरूपम यांनी विचारला. सरकार आणि पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते गरीब फेरीवाल्यांवर हल्ले करत आहेत. मात्र, सरकार आणि पोलीस शांतपणे हा तमाशा बघत आहेत. मनसेच्या या खळ-खट्याकला मुख्यमंत्री आणि पोलिसांचा छुपा पाठिंबा होत असल्यामुळेच हे शक्य होत असल्याचा आरोप यावेळी निरूपम यांनी केला.

गेल्या महिन्यात एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीत २३ लोक मरण पावल्यानंतर सर्वत्र रेल्वे प्रशासनाविरोधात आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात तीव्र संताप निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबररोजी मेट्रो ते चर्चगेट असा ‘संताप मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला होता. मुंबईतील रेल्वे स्थानके, पूल आणि रेल्वे स्थानक परिसरात बसणारे फेरीवाले यांना १५ दिवसात हटवा, अन्यथा सोळाव्या दिवशी मनसे आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

शनिवारी राज ठाकरेंनी दिलेले अल्टिमेटम संपले असून सकाळी ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आंदोलन केले. फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड करत मनसैनिकांनी त्यांना हाकलून दिले. या घटनेनंतर स्टेशन परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ‘काही जण आले, त्यांनी घोषणा दिल्या, आमच्या सामानाची तोडफोड केली आणि निघून गेले’, असे एका फेरीवाल्याने सांगितले. मनसेच्या अल्टिमेटमनंतरही फेरीवाल्यांच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. ठाणे आणि अन्य रेल्वे स्टेशनच्या आवारातील फेरीवाले ठाण मांडून आहेत. त्यामुळे आता मनसेच्या या खळ खट्याकमुळे फेरीवाल्यांवर वचक निर्माण होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.