भाजप नेत्यांपाठोपाठ सेनेकडून कोंडी; दानवेंच्या सहभागामुळे मंत्री अस्वस्थ

मराठा आरक्षण व मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील नेत्यांनीही कोंडी केली असताना शिवसेनाही ‘लक्ष्य’ करण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठा मोर्चाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने नाराजी असून ‘हतबल मुख्यमंत्री’ अशी टिप्पणीही शिवसेनेने केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच मुख्यमंत्री किंवा सरकारला मदत करण्याची भूमिका घेण्याऐवजी मोर्चामध्ये सामील झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला स्वकीयांकडूनच धोका असल्याचे मत ज्येष्ठ शिवसेना नेत्याने ‘लोकसत्ता’ शी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, दानवे मोर्चात सामील झाल्याने त्याची भाजप पक्षश्रेष्ठींपर्यंत ही बाब पोचविण्यात आली असून ज्येष्ठ मंत्री व नेते अस्वस्थ असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यभरात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चामुळे धाबे दणाणल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकारची चर्चेची तयारी असल्याचे जाहीर केले होते. पण चर्चेसाठी कोणीही पुढे आलेले नसून मुख्यमंत्र्यांनीही त्या दृष्टीने ठोस प्रस्ताव तयार करून कोणतीही पावले टाकलेली नाहीत. मराठा समाजाचे मोर्चे नियोजनानुसार निघत असून जालना येथील मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष दानवेही सहभागी झाले होते. भाजपच्या ज्येष्ठ मराठा मंत्र्यांपैकी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये रावसाहेब दानवे आहेत. यापैकी कोणीही सरकारच्या वतीने मोर्चाला सामोरे गेले नाही. उलट दानवे यांनी मोर्चात सहभागी होणे पसंत केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

मराठा मोर्चामुळे मुख्यमंत्री बदलले जातील, असे काहींना वाटत असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत नुकतेच केले होते. त्याचा संदर्भ देत स्वकीयांकडूनच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका असल्याची टिप्पणी शिवसेना नेत्यांनी केली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असताना आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले असतानाही मुख्यमंत्र्यांनी सल्लामसलत न केल्याने शिवसेनेनेही त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. विधिमंडळ व संसदेचे विशेष अधिवेशन या मुद्दय़ावर बोलावून चर्चा करण्याची भूमिका ठाकरे यांनी घेऊनही फडणवीस यांनी त्याची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे भूमिका ठरविण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

ल्ल मी सरकारचा नव्हे तर  भाजपचा प्रतिनिधी म्हणून मोर्चाला गेलो. हे कोणत्याही राजकीय पक्षाचे मोर्चे नसून सरकारविरोधी नाहीत. समाजाच्या प्रश्नांशी आम्ही सहमत असून आम्ही त्यांच्यासोबत नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण होऊ नये, यासाठी मोर्चात सामील झालो, अशी भूमिका दानवे यांनी घेतली .

‘अ‍ॅट्रॉसिटी’ विरोधकांना मत न देण्याचा निर्धार

राज्यात जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे हळुवार पडसाद दलित, आदिवासी, ओबीसी समाजात उमटू लागले आहेत. फुले-शाहू-आंबेडकरवादी व पुरोगामी सामाजिक संघटनांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शासकीय नोकऱ्यांमध्ये व शिक्षणामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. मात्र अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्याला विरोध करणाऱ्यांना यापुढे कोणत्याही निवडणुकीत मत द्यायचे नाही, अशी या संघटनांची रणनीती ठरत आहे. प्रतिमोर्चे काढायचे नाहीत, परंतु जिल्हााजिल्ह्य़ांत संविधान मोर्चे काढण्याची तयारी सुरू असून, त्याची सुरुवात अहमदनगरमधून केली जाणार आहे.  ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात नगरमध्ये मोर्चा काढून त्याची सुरुवात केली जाणार आहे.

बैठकांतील ठराव..

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करता येणार नाही, त्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात जरूर सुधारणा करावी, अशीही काही संघटनांनी भूमिका घेतली आहे. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभर परिषदा घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद येथे २५ सप्टेंबरला अशी एक परिषद होणार आहे.