गोरेगाव येथील आरे वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित मट्रो रेल्वे कारशेडबाबत र्सवकष अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. समितीला एक महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर मेट्रो कारशेडबाबतचा निर्णय घेतला जाईल. मेट्रो प्रकल्प-३ चे कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचे प्रस्तावित आहे.
परंतु त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होण्याची भीती व्यक्त करुन स्थानिक नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला आहे. या संदर्भात सोमवारी मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आमदार अशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रलायात भेट घेतली. त्यावेळी कारशेड उभारण्याबाबत सर्व शक्यता पडताळून पाहण्यात येत असून त्याचा र्सवकष अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.