मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दोघेही विदर्भाचे असताना तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र का थांबत नाही, असा ‘रोखठोक’ सवाल करत ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून साधण्यात आलेला निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी परतावून लावला, तोही अनुल्लेखाने! वर्तमानपत्राच्या माध्यमातून कोणी काही वक्तव्य केले म्हणजे अणुबॉम्ब फुटला, असे समजण्याचे कारण नाही अशी ‘मार्मिक’ प्रतिक्रिया नोंदवत मुख्यमंत्र्यांनी युतीत सर्व काही आलबेल असल्याचे सूचित केले.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली, परंतु खाती चांगली मिळाली नाहीत, म्हणून नाराजीचे सूर निघू लागले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच आता पुन्हा युतीतील कलगीतुऱ्याचा खेळ रंगला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही शेपूट घातलेले नाही, प्रसंगी सरकारशीच संघर्ष करू’अशी अचानक गर्जना केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्थैर्याच्या मुद्दय़ावर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याच्या दाव्याची खिल्ली उडविली. तर, मुख्यमंत्र्यांनी काळा पैसा स्वीकारू नये, असे अजब वक्तव्य करून राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी एका नव्याच वादाला तोंड फोडले. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी ‘सामना’च्या अग्रलेखात मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचे या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर देत शिवसेनेला अनुल्लेखानेच फटकारले.

कुणीतरी एखादे वक्तव्य केले म्हणजे काही अणुबॉम्ब फुटला नाही, युती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

शिवसेना आक्रमकच
‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातील भूमिका ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. ही सरकारविरोधात टीका नसून आम्हीही सरकारमध्ये सामील आहोत, याची जाणीव असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.