‘धोरण लकव्या’ची आणि फायली तुंबवल्याची टीका अनेकवार वाटय़ाला आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘राहून गेलेल्या कामांची यादी’ मांडताना छगन भुजबळ यांच्या  कार्यशैलीवर अप्रत्यक्ष टोलेबाजी केली. सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव म्हणून ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी नेमण्याचे राहूनच गेले, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र हे उत्तम राज्य आहे, असे अधिक आक्रमकपणे सांगता आले असते. मात्र, येथील दृष्टिकोन काहीसा पारंपरिक राहिला. एक महत्त्वाचे काम तसे राहूनच गेले, ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव म्हणून ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी नेमण्याचे! बहुतांश राज्यांमध्ये सिंचन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ‘आयएएस’ आहेत. केवळ महाराष्ट्रात ते नव्हते. सिंचन विभागात या श्रेणीतील अधिकारी आणता आला. मात्र, ‘पी.डब्ल्यू.डी.’मध्ये ती नियुक्ती राहून गेली.’
सार्वजनिक बांधकाम विभागातील भानगडी नेहमीच चर्चेत असतात. टोल प्रकरणानंतर या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच टोलमुक्तीची घोषणा केली. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री चव्हाण यांनी राहिलेल्या कामाच्या यादीत सार्वजनिक बांधकाम खात्यातील सचिवाच्या श्रेणीवर निर्माण केलेले सूचक प्रश्नचिन्ह भुजबळांच्या कार्यशैलीवर निशाणा साधणारे मानले जात आहे.
गेले करायचे राहुनी..
मुख्यमंत्री म्हणून काम करताना अनेक चांगले निर्णय घेता आले. राज्यात गुंतवणूकही मोठय़ा प्रमाणात झाली. मात्र, राज्याला औद्योगिक क्षेत्रात आणखी पुढे नेता आले असते.

शिक्षणाच्या गुणवत्तेवरही अधिक भर देण्याची गरज होती. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील गुणवत्ता तशी कमी आहे. ती वाढविण्यासाठी काही प्रयत्न झाले. मात्र, या क्षेत्रात ‘सरकार’ म्हणून अधिक करण्याची गरज आहे.
पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री