मतदान प्रक्रिया जलद व पारदर्शी करण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाचा विचार
सहकारी पतसंस्था, बँका, सहकारी, कर्मचारी सोसायटय़ा संस्थांच्या निवडणुकीसाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचविण्याबरोबरच पारदर्शकता आणण्याकरिता मतदानासाठी आता मतपत्रिकेऐवजी मतदान यंत्रांचा (ईव्हीएम मशीन) वापर करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १०० ईव्हीएम मशिन्स खरेदी करण्याचा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचा विचार आहे.

महाराष्ट्रात अडीच लाखांच्या आसपास सहकारी संस्था असून यातील मुंबईत ३०३३ सहकारी संस्था आहेत. शहरात बँका, पतसंस्था, सहकारी सोसायटय़ा, गृहनिर्माण संस्था, कर्मचारी सोसायटय़ा आदींचा समावेश आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीमुळे सगळ्याच सहकारी संस्थांना निवडणुका घेणे बंधनकारक असून आजवर या संस्थांच्या निवडणुका कागदी मतपत्रिकांद्वारे घेतल्या जात होत्या. यात वेळ वाया जात होता तसेच मतपत्रिकांमुळे बाद होणाऱ्या मतांची संख्यादेखील लक्षणीय होती. यावर तोडगा काढण्यासाठी ईव्हीएम मशीन वापराचा पर्याय पुढे आला.

मुंबई जिल्हा उपनिबंधक कार्यालय-१ यांच्याअंतर्गत येणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँक स्टाफ अ‍ॅण्ड ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीने त्यांची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर या सोसायटीची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक मंगेश तिटकारे यांनी स्पष्ट केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे १०० ईव्हीएम मशीन घेण्याचा विचार आहे. त्यासाठी लागणाऱ्या २ कोटी ३१ लाखांचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

भाडय़ाने या मशिन्स घेऊन निवडणूक घेणे हे सहकारी संस्थांना महाग पडणार असल्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणच या मशिन्सची खरेदी करण्याचा विचार करत आहे. या मशिन्स मोठय़ा सहकारी संस्थांच्या निवडणुकीवेळी ३ हजारांच्या आसपास भाडे घेऊन वापरण्यात येतील. यासाठी, ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून या मशिन्सच्या खरेदीचा प्रस्ताव मागवला असून तो सहकार विभागाकडे सादर केला आहे.

१०० मशिन्सचा हा प्रस्ताव असून त्यासाठी दोन कोटी ३१ लाखांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी दिली.

चार-चार दिवस निवडणुका

छोटय़ा गृहनिर्माण संस्था व सहकारी संस्था वगळता अन्य मोठय़ा सहकारी संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्स वापरण्यात येतील,  एसटी बँक, मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संस्था मोठय़ा असून यांच्या मतमोजणीत चार दिवस जातात. यावर मात करण्यासाठी ईव्हीएम मशिन्सचा पर्याय मोठय़ा संस्थांमध्ये उपयोगी ठरू शकेल. प्रथम पुण्यात व आता मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाला आहे.