कोळसा वाहतुकीचा आलेख घसरला; दर दिवशी मध्य रेल्वेच्या २५ मालगाडय़ा यार्डातच

यंदा पावसाने चांगला जोर धरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा रुळांवर आल्याच्या समजुतीला रेल्वेच्या मालवाहतुकीच्या उत्पन्नातील आकडय़ांनी तडा दिला आहे. अर्थव्यवस्थेतील उभारी दाखवणारी विजेची मागणी गेले दोन महिने घसरली असून त्यामुळे राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांमधील अनेक संच बंद राहिले. त्यामुळे या प्रकल्पांपर्यंत कोळशाची वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या उत्पन्नात ३० टक्क्यांची घट झाली.

महाराष्ट्रात ‘महाजनको’ आणि इतर दोन खासगी कंपन्यांकडून प्रत्येकी एकतृतीयांश वीज महावितरण विकत घेते. महाराष्ट्राची विजेची मागणी साधारण दर दिवशी १८ हजार युनिट एवढी असते. त्यामुळे प्रत्येक कंपनीकडून सहा हजार युनिटच्या आसपास वीज खरेदी केली जाते; पण गेल्या दोन महिन्यांमध्ये विजेची मागणी पाच ते सहा हजार युनिटने कमी झाली असून सध्या प्रत्येक कंपनीकडून साडेचार ते पाच हजार युनिट विकत घेतले जात आहेत.

‘महाजनको’चे महाराष्ट्रात चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, नाशिक आणि भुसावळ असे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. यापैकी परळी वीज प्रकल्प पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अडीच वर्षांपासून बंद आहे. चंद्रपूर येथील संच क्रमांक एक आणि दोन, भुसावळ, खापरखेडा हे संचही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावर होत आहे.

विदर्भातील आणि मध्य भारतातील कोळशाच्या खाणीतून राज्यातील या केंद्रांपर्यंत येणाऱ्या कोळशाची वाहतूक थांबली आहे. त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या कोळसा वाहतुकीवरही झाला आहे.

मध्य रेल्वेच्या प्रत्येक मालगाडीतून चार हजार टन कोळसा औष्णिक विद्युत प्रकल्पांपर्यंत पोहोचवला जातो, पण गेले दोन महिने दर दिवशी २५ मालगाडय़ांमधून वाहतूकच झालेली नाही. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या उत्पन्नावरही झाल्याचे मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील वाणिज्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दर दिवशी एक लाख टन कोळशाची वाहतूक बंद पडल्याने दोन महिन्यांत रेल्वेच्या उत्पन्नात ३० टक्क्यांनी घट झाल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले, पण गेल्या सात दिवसांपासून आता पुन्हा विजेची आणि पर्यायाने कोळशाची मागणी वाढल्याचेही त्याने स्पष्ट केले.

aadhaar