अवकाळी पाऊस, मेघाच्छादित आकाश, तापमानात झालेल्या वाढीमुळे लागलेल्या घामाच्या धारा, दोन दिवसांपासून पुन्हा गारवा आणि रविवारी सायंकाळपासून तर थंडीसह सोसाटय़ाचा वारा असा निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे वातावरणात पुन्हा सुखद गारवा निर्माण झाला आहे.
वाऱ्यांमुळे रविवारच्या सुट्टीच्या आनंदात सुखावणारी भर घातली. नरिमन पॉइंट, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी येथे मुंबईकरांनी हा ‘झोंबतो गारवा’ मित्रमंडळी आणि कुटुंबासह अनुभवला. पदपथावरील चणे-शेंगदाणे, भेळ, पाणीपुरी, चहा विक्रेते यांची मात्र या सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. चहाचे प्लास्टिकचे पेले, कुरमुरे भरलेल्या पिशव्या, हे पदार्थ तयार करण्यासाठीच्या शेगडय़ा, स्टोव्ह विझणार नाही, याची कसरत त्यांना करावी लागत होती.
दोन- पाच दिवसांपासून उकडायला लागले. मुंबईकरांना हे अंगवळणी पडत नाही तोच शनिवारपासून पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला. हे वातावरण आणखी एक-दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यातच सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे १९.०५ आणि १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईतील वातावरण बदलले आहे. सर्वसाधारणपणे उत्तरेकडून वारे वाहायला लागले की मुंबईत थंडी जाणवते. गेल्या दोन दिवसांपासून या वाऱ्यामुळे किमान तापमानात घट झाल्यामुळे हा गारवा/थंडी आली आहे. रविवारी या वाऱ्याचा वेग थोडा वाढल्याने मुंबईत दुपारनंतर चांगला गारवा निर्माण झाला आणि तापमानातही घट झाल्याचे वेधशाळेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.