मुंबईतील संत झेवियर्स महाविद्यालयात मुंबईतील ई-बिझ एंटरटेन्मेंटतर्फे २० व २१ फेब्रुवारी असे दोन दिवस सकाळी १० ते रात्री १० या वेळेत साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिकांशी साहित्य प्रकाशित करण्याचे थेट करार, साहित्यिकांचा गौरव, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, काव्य वाचन, लहान मुलांच्या चित्रपटांचे सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम या महोत्सवात पार पडणार आहेत. महोत्सवाबाबत सांगताना ई-बिझ एंटरटेन्मेंटच्या स्मिता पारीख म्हणाल्या की, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात साहित्यिकांशी त्यांचे साहित्य पाहून थेट प्रकाशन करण्यासाठीचे करार करण्यात येणार आहेत. यासाठी जगभरातील १२० लेखकांकडून संहिता प्राप्त झाल्या असून यातील निवडक साहित्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय सोहळ्यात नृत्य, कला, नाटय़, चित्रकला आदींचे शालेय विद्यार्थी सादरीकरण करणार असून चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियातर्फे लहान मुलांवरील दोन चित्रपटांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. महोत्सवात डॉ. श्रावण कुमार, दिग्दर्शक सतीश कौशिक, लवू रंजन आदींचा लहान मुलांचे जीवन व बालशोषण या विषयांवर परिसंवाद होईल. तर आर्थिक गैरव्यवहार या विषयावरील परिसंवादात प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांचा सहभाग असेल. तसेच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या खामोश या आत्मचरित्राचे प्रकाशन हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल असे पारिख म्हणाल्या. कवी इर्शाद कामिल यांचे समकालीन कवितांच्या वाचनाचे सत्र होणार असून महोत्सवात दुसऱ्या दिवशी अभिनेत्री मारिया गुरेटी ही भारतीय खाद्यसंस्कृतीवर आपले मनोगत मांडणार आहे.