३१ जुलैची मुदत गाठण्यासाठी विद्यापीठाची धावपळ

अध्यापनाचे काम बंद करून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्णवेळ करण्याची मुदत मुंबई विद्यापीठाने ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ३१ जुलैपर्यंत पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करणारच असा दावा बुधवारी केला असला तरी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मूल्यांकन सुरूच राहील, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विधीच्या परीक्षांचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागणार आहे.

राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी दिलेल्या मुदतीमध्ये निकाल जाहीर करण्यासाठी म्हणून विद्यापीठाने २४ ते २७ जुलै या काळात अध्यापनाचे काम बंद करून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्णवेळ करण्याचे आदेश प्राध्यापकांना दिले होते. राज्यपालांनी दिलेली मुदत येत्या सोमवारी, ३१ जुलै संपणार असली तरी कला, वाणिज्य आणि विधी परीक्षांच्या लाखो उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम बाकी आहे. त्यामुळे आता या शाखेच्या प्राध्यापकांना अजून चार दिवस म्हणजे २८ ते ३१ जुलैपर्यत पूर्णवेळ उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनही बाकी राहिल्याने या विषयाच्या प्राध्यापकांना अध्यापनाच्या कामानंतर ते काम करण्यास सांगण्यात आले आहे.

पदवी परीक्षांच्या रखडलेल्या निकालाबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेमध्ये बुधवारी मांडल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, सुमारे ५ लाख उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम बाकी असल्याची माहिती दिली होती. उर्वरित ३७३ परीक्षांचे निकाल ३१ जुलैपर्यंत विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येतील आणि एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी हमी त्यांनी दिली असली तरी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३१ जुलैपर्यंत मूल्यांकन सुरू असणार असल्याचे विद्यापीठानेच परित्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रलंबित राहिलेले हे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर होणार का याबाबत मात्र अनिश्चितता आहे.

अध्यापनाच्या कामाला सुट्टी देऊन पूर्णवेळ मूल्यांकनाचे काम करण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आल्यामुळे उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम पूर्ण झालेल्या काही प्राध्यापकांना मात्र विनाकरण सहा सहा तास बसून राहावे लागत आहे. काही महाविद्यालयांमधील कला शाखेच्या प्राध्यापकांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र केवळ विद्यापीठाचा आदेश असल्यामुळे त्यांना सकाळी ७ ते ८ या वेळेत लॉगइन करून बसावे लागते. विद्यापीठाच्या आदेशानुसार, महाविद्यालये बंद असल्यामुळे त्यांना दिवसभरामध्ये बराच वेळ रिकामा असूनही तासिका घेता येत नाहीत. सरसकट सर्वानाच दावणीला बांधणाऱ्या निर्णयामुळे एकीकडे आमचा वेळ वाया जात आहे आणि दुसरीकडे वेळ असूनही विद्यार्थ्यांच्या तासिका होत नाहीत, अशी तक्रार प्राध्यापक करीत आहेत.