कामगार चळवळीत कार्यरत प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते कॉ. के. एल. बजाज यांचे शुक्रवारी दुपारी मोठय़ा आजारानंतर निधन झाले. त्यांचे वय ७९ वर्षे होते.
तब्बल ६० हून अधिक वर्षांची राजकीय व कामगार संघर्षांची कारकीर्द राहिलेले कॉ. बजाज हे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य, तर ‘सिटू’ या कामगार संघटनेचे अखिल भारतीय उपाध्यक्ष होते. इंजिनीयरिंग वर्कर्स युनियन, जनरल एम्प्लॉइज युनियन तसेच रिलायन्स इलेक्ट्रिसिटी कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या युनियनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्रात ‘सिटू’च्या नेतृत्त्वात कामगारांना संघटित करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. कामगार चळवळीदरम्यान अनेक वेळा तुरुंगवासही त्यांना भोगावा लागला. १९५५ साली गोवा मुक्ती लढा आणि त्यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्येही ते सक्रिय होते.
कॉ. बजाज यांच्या पश्चात पत्नी, कन्या, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी  १९ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरळी येथील जनशक्ती कार्यालयातून निघेल.