इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली महावितरण कंपनीने बिलांमध्ये केलेली वाढीव खर्चाची आकारणी रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केली असून, त्यावर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या वीज बिलांमध्ये ७३.२४ पैसे प्रति युनिट जादा इंधन समायोजन आकारणी राज्यातील सर्व सव्वा दोन कोटी ग्राहकांकडून वसूल करण्यात आली आहे.
महावितरण कंपनीला अतिरिक्त ५०० कोटी मिळाले असले तरी ग्राहकांना वीज बिलाचा शॉक बसल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी केली आहे. ही जादा आकारणी तीन महिने करण्यात येणार आहे. महागडय़ा वीज खरेदीमुळेच ही दरवाढ ग्राहकांवर लादण्यात आली असून, नियामक आयोगाच्या आदेशाच्या विरोधात ही दरवाढ करण्यात आली आहे.