रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशांनुसार मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील अपघातांच्या वाढत्या प्रमाणाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन झाली असून या समितीत नऊ जणांचा समावेश आहे. ही समिती महिनाभरात आपली निरीक्षणे नोंदवणार असून ३१ डिसेंबपर्यंत मुंबईतील अपघातांबाबतचा आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करणार आहे. विशेष म्हणजे या समितीत खासदार, रेल्वे अधिकारी यांच्यासह प्रवासी प्रतिनिधींचाही समावेश आहे.
‘भावेश नकाते’ अपघात प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील वाढत्या अपघातांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही नऊ सदस्यीय समिती स्थापन झाली असून या समितीची पहिली बैठक ६ डिसेंबर रोजी होणार आहे. या समितीला उपनगरीय मार्गावरील अपघातांचा अभ्यास करून आपला अहवाल एका महिन्यात म्हणजे ३१ डिसेंबपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे सादर करायचा आहे.
या समितीत किरीट सोमय्या, राजन विचारे, अरविंद सावंत आणि पूनम महाजन या खासदारांचा समावेश आहे. रेल्वेतर्फे मध्य रेल्वेचे
महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद या समितीत असतील, तर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई रवींद्रन आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख या समितीत असतील. त्याशिवाय सेवाभावी संस्थेचे एल. आर. नागवाणी आणि प्रवासी संघटनेचे केतन गोराडिया यांचा समावेश या समितीत आहे.