सुरक्षेचे कारण पुढे करून रस्ता आणि पदपथ अडवून सर्वसामान्यांना प्रवेश नाकारणाऱ्या ताज महाल हॉटेलबरोबरच मुंबई स्टॉक एक्स्चेंज आणि हॉटेल ट्रायडेन्टवर दोन वेळा ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावूनही त्याचे साधे उत्तर पालिकेला पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे या तिघांविरुद्धचे गाऱ्हाणे निवनियुक्त पालिका आयुक्तांसमोर मांडण्याचा निर्णय पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. आयुक्तांबरोबर लवकरच होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुंबईवर २६/०८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताज महाल हॉटेल आणि हॉटेल ट्रायडेंट लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव या दोन्ही व्यवस्थापनाने आसपासचा पदपथ आणि रस्ता बॅरिकेड लावून अडविला. तसेच या परिसरात सामान्य नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पालिकेने ताज महाल हॉटेल, हॉटेल ट्रायडेन्ट आणि अशाच प्रकारे रस्ता अडविणाऱ्या मुंबई स्टॉक एक्स्जेवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. तसेच हॉटेल ट्रायडेंटसह ताज महाल हॉटेलवर सुमारे २.१३ कोटी, मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर सुमारे २.५ कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. मात्र या तिघांकडून कोणताही प्रतिसाद पालिकेला मिळाला नाही. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा या तिघांवरही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती, अशी माहिती पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चौरे यांनी दिली.