बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप

उत्पन्नापेक्षा कैक पटीने जास्त माया गोळा करणाऱ्या भारतीय महसूल सेवेतील(आयआरएस) वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी गुन्हा नोंदवला. विवेक बत्रा असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते प्राप्तिकर विभाग (मुंबई) येथे अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या वरिष्ठ अधिकाऱ्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा हा दुसरा गुन्हा आहे.

गुन्हा दाखल होताच मुंबई, ठाणे, दिल्ली, सिल्वासा, कर्नाल येथे १० ठिकाणी छापे घालून बत्रा यांच्या मालमत्तेविषयी तपास करण्यात आला, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. विराच कंपनी आणि अलोक इंडस्ट्रीज या दोन खासगी कंपन्यांबाबत सीबीआय अधिक चौकशी करते आहे. एप्रिल महिन्यात बत्रा यांच्या विरोधात तक्रार आली होती. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला अशी माहिती सीबीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली

२००५ मध्ये सीबीआयने बत्रा यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा गुन्हा नोंदवून तपास केला होता. २०१३च्या सुमारास त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. त्या आधी वित्त मंत्रालयाकडून परवानगी घेण्यात आली होती. त्यास बत्रा यांनी आधी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या विरोधात निकाल दिला होता.

मिळकतीच्या सहापट मालमत्ता

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांमध्ये बत्रा यांचे उत्पन्न १.४३ कोटी होते. मात्र त्यांच्या नावे ६.७९ कोटींची मालमत्ता आहे, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्तेचे प्रमाण ४७३ टक्के आहे. या गुन्हय़ात त्यांची पत्नी प्रियांका, सीए शिरीष शहा, विराज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज कुमार, अलोक इंडस्ट्रीचे संचालक दिलीप जीवर्जिका यांनाही आरोपी करण्यात आले आहे.