शाळांना गणपती उत्सवासाठी पाच दिवस सुट्टी देण्यावरून दरवर्षी वाद होत असतात. याही वर्षी विविध संघटनांकडून या सुट्टीसाठी मागण्या झाल्या पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमावस्था असतानाच ठाणे महापालिकेने गणपतीसाठी पाच दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईत मात्र विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून सुट्टय़ांबाबतचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा, असे नमूद केले आहे.
गणेशोत्सवादरम्यान राज्यातील सर्वच शाळांना पाच दिवसांची सुट्टी द्यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, खासगी अनुदानित व विनाअनुदानित तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे पालिका क्षेत्रातील मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मुंबईत मात्र विभागीय अध्यक्षांनी सुट्टीबाबत पत्रक काढून सुट्टी देण्याचे सर्वाधिकार मुख्याध्यापकांना दिले आहेत. हे अधिकार देताना शैक्षणिक वर्षांतील सुट्टय़ा ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची खबरदारीही घेण्यास बजावले आहे. यामुळे बहुतांश मुख्याध्यापकांनी सुट्टय़ा न देण्याचाच निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी सुट्टी घेऊ नये यासाठी काही शाळांमध्ये तर गणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा ठेवल्या आहेत. तर काही शाळांनी गणेशोत्सव संपल्यावर लगेचच परीक्षा ठेवल्या आहेत. यामुळे पालक संभ्रमावस्थेत आहेत.

गणेशोत्सवाच्या सुट्टय़ांबाबत दरवर्षी गोंधळ असतो. हे टाळण्यासाठी शिक्षण विभागाने जूनमध्ये सुट्टय़ांचे वेळापत्रक जाहीर करतानाच गणेशोत्सवाच्या सुट्टय़ा जाहीर कराव्यात. सुट्टय़ांबाबतीत राज्यात एक समान वेळापत्रक असावे.
– अनिल बोरनारे, उत्तर विभाग अध्यक्ष (शिक्षक परिषद)