मराठा आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन वादाचा फटका ‘यूपीएससी’सारख्या केंद्रीय प्रशासकीय सेवांसाठी ‘स्टेट इन्स्टिटय़ूट फॉर मिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स’ (एसआयएसी) या संस्थेच्या माध्यमातून तयारी करू इच्छिणाऱ्या राज्यातील हजारो उमेदवारांना बसतो आहे.

यूपीएससीकरिता राज्यातील सुमारे ५०० निवडक उमेदवारांची एसआयएसी विविध केंद्रांमधून तयारी करवून घेतली जाते. एसआयएसीमध्ये प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना एक वर्षांकरिता राहण्याची सोय आणि दरमहा दोन हजार रुपये पाठय़वेतन मिळते. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेत रस असलेल्या ग्रामीण भागातील उमेदवारांना या संस्थेतील प्रवेश हा मोठा आधार ठरतो. या प्रवेशांना आरक्षणाचे नियम लागू केले जातात. परंतु सध्या सुरू प्रवेशांना मराठा-मुस्लीम आरक्षण लागू करायचे काय, या प्रश्नामुळे एसआयएसीची मुंबईसह नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद येथील प्रवेश प्रक्रिया गेले दोन महिने रखडली आहे.

हे प्रवेश सीईटीमार्फत केले जातात. मुंबईचे उदाहरण द्यायचे तर १६ नोव्हेंबर, २०१४मध्येच एसआयएसीने प्रवेश परीक्षा घेतली होती. त्यानंतर साधारणपणे १० दिवसांत सीईटीचा निकाल जाहीर करून १ जानेवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ात अभ्यासक्रम सुरू केला जातो. परंतु, दोन महिने झाले तरी मुंबई केंद्राने निकाल जाहीर केलेला नाही. त्याऐवजी मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन वादामुळे निकाल प्रलंबित असल्याची नोटीस केंद्राच्या संकेतस्थळावर लावण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे, सध्याच्या प्रवेशांना हे आरक्षण लागू करायचे, असा प्रश्न एसआयएसीला पडला आहे. या संबंधात केंद्रांच्या संचालकांनी नोव्हेंबर, २०१४मध्येच राज्य सरकारकडून खुलासा मागविला होता. परंतु, दोन महिने उलटले तरी त्याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रवेश प्रक्रिया रखडल्याने काही संचालकांनी स्मरणपत्रे पाठवून लवकरात लवकर खुलासा करण्याविषयीही कळविले. मात्र यावरही सरकार ढिम्म आहे.

एकटय़ा मुंबईत १२० जागांकरिता तब्बल ६५०० हजार उमेदवारांनी सीईटी दिली होती. हे सर्वच उमेदवार सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यूपीएससी पूर्वपरीक्षा ऑगस्ट २०१५ मध्ये होणार आहे. त्याकरिता जानेवारीपासून अभ्यासक्रम सुरू व्हायला हवा होता. या उमेदवारांचा एक महिना असाच वाया गेला आहे. यूपीएससीची पूर्वपरीक्षा अवघ्या सहा महिन्यांवर आली असल्याने आपल्या हातून वेळ निसटून जात असल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे.

याबाबत मुंबईच्या एसआयएसीच्या केंद्राचे संचालक डॉ. एम. बी. भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मराठा आरक्षणासंबंधातील वादामुळे निकाल रखडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. आमचा निकाल तयार आहे. परंतु, याबाबत सरकारकडून खुलासा न आल्याने मुंबईसह सर्वच केंद्रांचे प्रवेश रखडले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.