रेल्वे मंत्रालयाने येत्या २१ जानेवारीपासून केलेल्या दरवाढीचा सर्वात मोठा फटका मुंबईकर लोकल प्रवाशांना बसल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता रेल्वेने ही दरवाढ लादताना दरवाढीचे अजब गणित मांडले आहे. दरवाढीनंतर ११ रुपयांवर गेलेल्या तिकिटाचे दर दहा रुपये करण्याचा शहाणपणा दाखवतानाच १२ रुपयांच्या तिकिटाचे दर मात्र १५ रुपये करण्याचा प्रकार रेल्वेने केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दोन रुपयांनी वाढलेले तिकीट मुंबईकरांना पाच रुपये जास्त भरून खरेदी करावे लागणार आहे.
रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी बुधवारी केलेल्या घोषणेनंतर मुंबईतील उपनगरी रेल्वेचे भाडे आता निश्चित झाले असून किमान तिकीट ५ रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्व तिकिटे ही पाच रुपयांच्या पटीत पूर्णाकात करण्यात आली आहेत. या अंकगणितानुसार उपनगरी प्रवासाचे तिकीट ११, २१ अथवा ३१ रुपये झाले तर ते अनुक्रमे २०, २० आणि ३० रुपये होणार आहे. परंतु ते १२, १३, १४ अथवा २२, २३, २४ रुपये झाले तर मात्र थेट १५ अथवा २५ रुपये होणार आहे.
पूर्णाकाच्या पटीत दर आकारताना त्याची विभागणी निम्म्यावर होते. म्हणजेच तिकिटाची रक्कम १२.५० रु. झाल्यास ती १० रुपये व त्याहून जास्त झाल्यास १५ रुपये अशी विभागणी व्हायला हवी होती. परंतु ‘११ चे १० आणि १२ चे १५’ असे अंकगणित मांडून रेल्वेने मुंबईकरांचा खिसा कापला आहे.
 याप्रमाणे सीएसटी-ठाणे आणि चर्चगेट-अंधेरी, सीएसटी-कल्याण यांचे द्वितीय वर्गाचे तिकीट १५ रुपये असेल. त्याचप्रमाणे सीएसटी-पनवेल दुसऱ्या वर्गाचे तिकीट २० रुपये असेल.