काँग्रेसचा शिवसेनेला सल्ला

इंदू मिल किंवा पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांचा कार्यक्रम, भाजप मित्रपक्ष शिवसेनेला अजिबात किंमत देत नाही हे सिद्ध झाले आहे. अशा वेळी सत्तेला चिकटून राहण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असा चिमटा काँग्रेसने काढला आहे.

मित्रपक्षाने विरोध केल्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची वेळ भाजपवर आली. सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार निंदनीय आहे. कायदा हातात घेणाऱ्या शक्तींना वेळीच रोखण्याची गरज आहे. पण भाजप सरकारकडून तसे होताना दिसत नाही.  कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेल्या समीर गायकवाडलाही मदत केली जात आहे. एकूणच सरकारचा कारभार कायदा आणि सुव्यवस्था रोखण्यात अयशस्वी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे अनंत गीते यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित होते. शिवसेनेचा राष्ट्रवाद तेव्हा कुठे गेला होता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.