लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील नेते आशावादी असून, गतवेळेप्रमाणेच काँग्रेस सर्वाधिक जागाजिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा निर्धार नेतेमंडळींनी सोमवारी केला. आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या भाजपवरच भ्रष्टाचाराचे आरोप करीत, विधानसभेच्या निवडणूक प्रचारात पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हेच काँग्रेसचे लक्ष्य राहील, असे स्पष्ट संकेत देतच आज पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले.
निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये घोळात घोळ असतो. पण यंदा मात्र प्रचाराची सुरुवात करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली. लोकसभा पराभवाच्या पाश्र्वभूमीवर पक्षातील मरगळ दूर करण्याकरिता प्रचारालाच अगोदर सुरुवात करण्यावर प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांचा भर आहे. हुतात्मा स्मारकास अभिवादन करून प्रचाराची ज्योत प्रज्वलित करण्यात आली, मग आझाद मैदानात प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्षांकडे ज्योत सोपविण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे या नेत्यांसह सर्व मंत्री व अन्य नेते याप्रसंगी उपस्थित होते. हुतात्मा स्मारकात प्रचाराला सुरुवात करून अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
विधानसभेच्या निवडणुकीत १९९९ पासून काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीतही काँग्रेसचे सर्वाधिक ८२ आमदार निवडून आले होते. यंदाही काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, आणि काँग्रेसचा पहिला क्रमांक कायम राहील, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत देशातच काँग्रेसचा पराभव झाला. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुद्दे वेगळे असतात, राजकीय परिस्थिती वेगळी असते. लोकसभेचाच कल विधानसभा निवडणुकीत राहात नाही हे यापूर्वी निकालांतून स्पष्ट झाले आहे. राज्यातही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा आशावाद विविध नेत्यांनी व्यक्त केला.

भाजपवरच आरोप
आघाडी सरकारच्या कारभारावर भाजपचे नेते आरोप करीत आहेत. पण भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून राजीनामा द्यावा लागलेल्या येडियुरप्पा यांना लोकसभेची उमेदवारी आणि आता भाजपचे उपाध्यक्षपद देण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये घोटाळ्यात भाजपच्याच मंत्र्याला तुरुंगाची हवा खावी लागली. राजस्थानमध्येही कारभार सरळ नाही. मग राज्यातील भाजपच्या नेत्यांना आघाडी सरकारवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार  आहे का, असा सवाल नारायण राणे यांनी केला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई वाढली. भाजपच्या मंत्र्यांबद्दलच सरकारमधून संशयाचे वातावरण तयार करण्यात आले. मुंबईत रेल्वेची दरवाढ करण्यात आली. ही पाश्र्वभूमी असताना भाजप काय दिवे लावणार, असा सवाल राणे यांनी केला. भाजपने खोटी आश्वासने दिली़  पण जनतेचा या सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.