दुष्काळाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यावर भर दिला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने तयारी सुरू केल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी आतापासूनच सावध पवित्रा घेतला आहे.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नारायण राणे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, डॉ. पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील आदी नेतेमंडळी या वेळी उपस्थित होती. ‘आदर्श’ घोटाळ्यापासून अशोक चव्हाण यांना पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले जात असे.
मात्र, निवडक नेत्यांच्या बैठकीला चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले होते. मराठवाडय़ाती धुरा चव्हाण यांनी सांभाळावी असाच एकूण पक्षात सूर आहे. दुष्काळाच्या मुद्दय़ावर फक्त राष्ट्रवादीच मदतीस धावून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसनेही दुष्काळग्रस्त भागात मदतीसाठी पुढाकार घेण्याबरोबरच पंतप्रधानांच्या माध्यमातून राज्याला जास्त मदत मिळविण्यावर भर दिला आहे.  गेल्या काही दिवसांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये लक्षात घेता त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असाच बैठकीतील सूर होता. प्रत्येक विभागवार त्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्याकडे अधिक लक्ष केंद्रित करतानाच मराठवाडय़ाकडे लक्ष दिले आहे. काँग्रेसनेही विदर्भ या आपल्या बालेकिल्ल्यात सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे करण्याबरोबरच मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्तांची अधिक काळजी घेण्याचे ठरविले आहे. मराठवाडय़ात राष्ट्रवादीला शह देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रदेश काँग्रेसच्या उद्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दुष्काळ आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे.
 गेल्या वेळी राज्यातून काँग्रेसचे १७ खासदार निवडून आले होते. ही संख्या जास्त कमी होऊ नये हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला उत्तर दिले पाहिजे, असाच पक्षात सूर आहे.