लोकसभेतील दारुण पराभवानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नावही काँग्रेस नेत्यांकडून घेतले जात नाही. तसाच प्रकार राज्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत सध्या अनुभवास येत आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पृथ्वीराजबाबा दिसेनासे झाले आहेत. नारायण राणे वा अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली असताना चव्हाण हे साऱ्यांपासून सध्या दूर आहेत.
कोणत्याही पक्षात विजयाचे श्रेय घेण्याकरिता नेतेमंडळींमध्ये स्पर्धा असते. पराभवाचे खापर मात्र एकाच नेत्यावर फोडले जाते. राज्यातील काँग्रेसच्या पराभवाचे सारे खापर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडण्यात आले. स्वत: चव्हाण यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. पराभवानंतर माणिकराव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाने अद्याप त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड लांबणीवर पडल्याने ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना आक्रमक करण्यावर भर दिला. सध्या ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांच्या निवडणुका या पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. यापाठोपाठ नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलाविण्यात आले नव्हते. तसेच नारायण राणे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील या माजी मुख्यमंत्री वा मंत्र्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र साऱ्या घडामोडींमध्ये दूर ठेवण्यात आले आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा दारुण पराभव झाला. पुन्हा त्यांच्याकडे कशी जबाबदारी सोपवायची, असा सवाल पक्षातून व्यक्त केला जातो.
पराभवापासून पृथ्वीराज चव्हाण यांनीही चार हात लांब राहण्यावर भर दिला आहे. सध्या आपण कराड मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे पक्षात कोणतीही जबाबदारी घेण्याचे टाळल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी त्यांचे फार काही सख्य नाही. मोहन प्रकाश यांच्याबरोबर काम करण्याचे पृथ्वीराजबाबा टाळतात, असे चित्र आहे.