मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेले गुरूदास कामत यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचे निवेदनच कामत यांनी प्रसिद्ध केले आहे. गुरूदास कामत यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुदास कामत निवेदनात म्हणतात की, गेल्या चार दशकांहून अधिक काळ मी काँग्रेस पक्षासाठी काम केले. पण पक्षातील इतरांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी मला आता माघार घ्यायला हवी, असे मला गेल्या काही महिन्यांपासून वाटत होते. दहा दिवसांपूर्वी मी काँग्रेस अध्यक्षांना भेटून माझी तशी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. त्यानंतर तसे पत्र देखील मी सोनिया आणि राहुल गांधी यांना पाठविले होते. मी पक्षातील सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि पक्षाला पुढी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

गुरूदास कामत यांची राजकीय कारकीर्द-
१९७६ साली गुरूदास कामत यांनी एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर १९८४ साली पहिल्यांदा कामत काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी पाच वेळा ईशान्य मुंबईतून लोकसभेत प्रतिनिधित्व केले, तर २००९ ते २०११ या काळात यूपीए सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. याशिवाय त्यांच्याकडे केंद्रीय गृहखाते आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार यूपीए सरकारच्या काळात देण्यात आला होता. २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांच्याकडून गुरूदास कामत यांना पराभवाचा धक्का बसला.