विधानसभेतील दारुण पराभवापासून पक्ष सावरलेला नसतानाच पालघर जिल्हा परिषदेत पक्षाचा फक्त एक सदस्य निवडून आल्याने काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते चक्रावले आहेत. पक्ष कसा वाढेल यासाठी शनिवारी वरिष्ठ नेत्यांनी विचारमंथन केले, तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष वाढणार नाही, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला.
ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघर जिल्हा निर्मितीसाठी काँग्रेसने पुढाकार घेतला. पण विधानसभा निवडणुकीत त्या जिल्ह्य़ात सहापैकी एकही जागा जिंकता आली नाही. या पाठोपाठ शुक्रवारी निकाल जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेत फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली. पक्षाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न नेतेमंडळींना पडला आहे.
सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर-पाटील, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे या चार माजी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, डॉ. पतंगराव कदम, हुसेन दलवाई, जयप्रकाश छाजेड, हर्षवर्धन पाटील आदी निवडक नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुढील आव्हानांबाबत विचारमंथन करण्यात आले. राज्यात पक्ष वाढीसाठी कसे प्रयत्न करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. पराभवाचे आत्मपरीक्षण करा मगच पुढील विचार करा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री राणे यांनी दिला.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्या कोणी वाली नाही. पक्ष संघटना काय करते याचा पत्ता नाही, असा आरोपच नारायण राणे यांनी केला.
काँग्रेसचे आंदोलन
राज्यातील भाजप सरकार येत्या ७ तारखेला १०० दिवस पूर्ण करीत आहे. त्या दिवशी हे सरकार कसे अपयशी ठरले वा आश्वासनांची पूर्तता केलेली नाही याचा पोलखोल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्यास विलंब लावण्यात येत आहे. हा मुद्दा प्रकर्षांने मांडून शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.