आघाडीतील जागावाटपावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेसविरोधी वाटू लागल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे. मात्र आम्ही आघाडी तोडण्याच्या विरोधात आहोत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. निवडणुकीवेळी ते काँग्रेसविरुद्ध अपक्ष उमेदवारास उभे करत असूनस ही काँग्रेसविरोधी भूमिका असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वाबरोबरच मोदींच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे. या निवडणुकीत भाजपाने खराब कामगिरीचे प्रदर्शन केल्यास लोकसभेतील भाजपाचा विजय हा केवळ हवाच होती, हे स्पष्ट होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मोदींच्या गुजरात पॅटर्नवरही त्यांनी जोरदार टीका केली. तसेच आपल्या उमेदवारी बाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.