विदर्भातील प्रकार; काँग्रेस आमदाराची पक्षाकडे तक्रार
राज्यसभेच्या खासदारांचा निधी पक्ष संघटना वाढीच्या उद्देशाने वापरला जात असला तरी काँग्रेसच्या राज्यातील दोन राज्यसभा सदस्यांनी त्यांचा निधी भाजप आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामांकरिता दिल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करून, पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा एका आमदारानेच व्यक्त केली आहे.
राज्यसभा व विधान परिषद सदस्यांच्या निधीवर राजकीय पक्षांकडून नियंत्रण ठेवले जाते. पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल अशा मतदारसंघांमध्ये या निधीचा विनियोग केला जातो. जेणेकरून पुढील निवडणुकीत विजयाचे गणित जुळू शकेल, असा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो. डाव्या पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना खासदार निधी कुठे खर्च करायचा याचा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेतला जातो. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा खासदार आणि विधान परिषद सदस्यांच्या निधीच्या वापराकरिता पक्षात विशेष विभाग तयार केला आहे. काही आमदारांनी मनासारखा खर्च केला असता त्यांना पवार यांनी मागे पक्षाच्या बैठकीत कानपिचक्या दिल्या होत्या व पुन्हा आमदारकी देताना याचा विचार केला जाईल, असेही सुनावले होते. ही पाश्र्वभूमी असली तरी काँग्रेसमध्ये निधीच्या वापराबाबत खासदारांवर काही ताळमेळ दिसत नाही.
राज्यातून निवडून गेलेले काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनी मात्र अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाटात विकासकामांसाठी तब्बल सव्वा कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक आरोपच काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांना राज्यसभा सदस्यांकडून निधी मिळत नाही, पण भाजप आमदारांच्या मतदारसंघात निधी कसा दिला जातो, असा थेट सवाल आमदार वीरेंद्र जगताप यांनी पक्षाच्या बैठकीत केला.

निधी दिलेला नाही -शुक्ला
भाजप आमदाराच्या मतदारसंघात आपला खासदार निधी देण्यात आला, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आला असला तरी तसे पत्र दिल्याचे आपल्याला आठवत नाही, असे खासदार राजीव शुक्ला यांचे म्हणणे आहे. निधी मिळावा म्हणून अनेकांची पत्रे येतात. या संदर्भात अधिक माहिती घेऊन बोलणे योग्य होईल, असेही खासदार शुक्ला यांनी सांगितले.