भाजप लाटेत तग धरण्यासाठीच, विधानसभा निवडणुकीच्या वेळी बिघाडी झाली असली तरी आगामी ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदा तसेच नवी मुंबई तसेच औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीबरोबर पुन्हा एकदा आघाडी करण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार नेतेमंडळींना देण्यात आले आहेत.
ठाणे व पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जानेवारीअखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिका, बदलापूर-कुळगाव नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी नेत्यांशी चर्चा केली. या निवडणुकांमध्ये सर्वच समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याची तयारी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची असल्यास स्थानिक पातळीवर चर्चा केली जावी. तेथे एकमत झाले तर आघाडीचा निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यात भाजपची घोडदौड रोखण्याकरिता काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविली आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना सहभागी झाल्यापासून भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. अलीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारच्या विरोधात एकत्र आलेले चित्र बघायला मिळाले. अर्थात, काँग्रेसने आघाडीची तयारी दर्शविली असली तरी राष्ट्रवादीकडून कसा प्रतिसाद मिळतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी गणेश नाईक हे पक्षात राहण्याबाबत साशंकता आहे. त्यांना भाजपचे वेध लागले आहेत. नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यास राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज भासेल. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. ‘एमआयएम’चा प्रभाव वाढल्याने औरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला.
अल्पसंख्याक मतपेढी एमआयएमकडे गेल्याने काँग्रेसचे नेते सध्या चिंताग्रस्त आहेत. यामुळेच उभय पक्षांना परस्परांची गरज भासणार आहे. ठाणे आणि पालघरमध्ये काँग्रेसची संघटना कमकुवत आहे. दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. यामुळेच आघाडीची काँग्रेसची तयारी आहे.

राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची असल्यास स्थानिक पातळीवर चर्चा केली जावी. तेथे एकमत झाले तर आघाडीचा निर्णय घेतला जाईल
-माणिकराव ठाकरे,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष