नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. मुंढेविरोधात मंगळवारी महापालिकेत अविश्वास ठराव मांडला जाणार असून यात दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नगरसेवकांसाठी व्हिप बजावला आहे.

धडाकेबाज कार्यशैली आणि शिस्तप्रियतेमुळे नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असले तरी राजकारणी मात्र त्यांच्यावर नाराज आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर सुधाकर सोनावणे यांच्याशी मतभेद झाल्याने आयुक्तांविरोधातील मोहिमेने वेग पकडला आहे. याचाच परिपाक म्हणून मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत या अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. १११ नगरसेवक असलेल्या नवी मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून ६७ नगरसेवक आहेत. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ६९ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ मतदान करणे गरजेचे आहे. शिवसेनेचे नगरसेवकही या ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सेनेची साथ मिळाल्यास अविश्वास ठराव मंजूर होण्याची चिन्हे आहेत. महासभेत नगरसेवकांनी दांडी मारु नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी व्हिप बजावला आहे.
भाजपचे सहा नगरसेवक या अविश्वास ठरावादरम्यान तटस्थ राहण्याची शक्यता आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे मुंढेंशी मतभेद आहे. पण मुख्यमंत्र्यांचा मुंढेंना पाठिंबा असल्याने भाजपने तटस्थ राहणेच पसंत केले आहे. दुसरीकडे नवी मुंबईतील रहिवासी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मिडीयावरही यासाठी मोहीम राबवली जात आहे.

प्रस्ताव मंजूर झाला तरी मुंढेंना दिलासा ?

तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यास कायद्यातील तरतुदींनुसार त्यांना माघारी बोलावणे नगरविकास विभागाला बंधनकारक आहे. मात्र, कधी बोलवावे, याचा कालावधी निश्चित नसल्याने मुख्यमंत्री तुकाराम मुंढे यांना आणखी काही काळ आयुक्तपदावर कायम ठेवतील, असे संकेत मिळत आहेत.