काँग्रेस, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मराठा समाजाच्या मोर्चाच्या माध्यमातून कुठेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली नाही. तरीही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खुर्चीची भीती का वाटते, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांना पक्षातून काही सूचित करण्यात आले आहे का, अशी विचारणा राष्ट्रवादीने केली आहे.

मराठा समाजाच्या मोर्चाच्या माध्यमातून मला हटविण्याचे प्रयत्न झाले तरी समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का? किंवा किती दिवस मुख्यमंत्रीपदावर असेन याची पर्वा नाही, अशी विधाने मुख्यमंत्री करू लागल्याने फडणवीस यांची खुर्ची भक्कम नाही, असा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढला आहे. मराठा समाजाच्या मोर्चामध्ये कोठेही फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली नाही. हे मोर्चे समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांना खुर्चीची भीती वाटते म्हणजे काही तरी पाणी मुरत असावे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. केरळमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत फडणवीस यांना काही सूचित करण्यात आले आहे की त्यामुळेच त्यांनी आवराआवरीची भाषा सुरू केली हे स्पष्ट झाले पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

सेना मोर्चाविरोधी-सावंत

शिवसेनेच्या मुखपत्रातून मराठा समाजाच्या मोर्चाची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. यामुळे शिवसेनेची मराठा समाजाबद्दलची भूमिका कशी विरोधात आहे हे स्पष्ट होते, असा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.