वसई-विरार महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्व जागांवर उमेदवार सापडले नसल्याने ज्या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार नाही अशा ठिकाणी राष्ट्रवादीला काँग्रेसचा पाठिंबा तसेच राष्ट्रवादीचा उमेदवार असलेल्या प्रभागांमध्ये काँग्रेसचा पाठिंबा, असा समझोता उभयतांनी केला आहे.
वसई-विरार महापालिकेच्या १११ प्रभागांसाठी (चार प्रभागांमध्ये बिनविरोध निवड) रविवारी मतदान होत आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला आव्हान देण्याचा शिवसेना-भाजप व काँग्रेसचा प्रयत्न असला तरी हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या प्रभागांमध्ये परस्परांचे उमेदवार नाहीत अशा ठिकाणी एकमेकांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. शिवसेना-भाजपची युती असली तरी भाजपने सरकारला असलेला ठाकूर यांचा पाठिंबा लक्षात घेता फार टोकाची भूमिका घेण्याचे टाळले आहे.
काँग्रेसचे ५०च्या आसपास तर राष्ट्रवादीचे २० ते २२ प्रभागांमध्ये उमेदवार आहेत. राष्ट्रवादीने निवडणुकीची जबाबदारी गणेश नाईक यांच्यावर सोपविली असली तरी वसईत पक्षाचा ठाकूर यांच्याशी असलेला घरोबा लक्षात घेता नाईक यांनी दूर राहणेच पसंत केले आहे. २०-२२ उमेदवारांच्या बळावर निवडणूक गांभीर्याने कशी लढविणार असा नाईक यांनाही प्रश्न पडला आहे. यातूनच नाईक यांनी वसईला प्रचारात जाण्याचेही टाळल्याची चर्चा आहे.
ठाकूर यांच्या पक्षाने ख्रिश्चन बहुल प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. वसईतील चर्चची भूमिका महत्त्वाची असते. पण यंदा चर्चने ठोस भूमिका घेतलेली नसल्याचे सांगण्यात आले.
जनआंदोलनाची ताकद कमी झाल्यानेच ख्रिश्चनबहुल प्रभागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले. पक्षाचे सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस यांना मुद्दामहून प्रचारासाठी बोलाविण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वसई आणि विरारमध्ये जाहीर सभा घेऊन ठाकूर यांचा पाडाव करण्याचे आवाहन केले.
मतांसाठी  धडपड
वसई गावातील ख्रिस्ती मतदार नेहमीच या परिसरातील प्रस्थापित ठाकूर यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. हरित वसई चळवळीच्या माध्यमातून वसईचा हरित पट्टा कायम राहण्याबरोबरच कॉक्रिटचे जंगल उभे राहण्यापासून वाचविण्यासाठी स्थानिक ख्रिश्चन समाजाने पुढाकार घेतला होता. या समाजाच्या पाठिंब्यामुळेच गेल्या निवडणुकीत जनआंदोलनाचे विवेक पंडित विधानसभेवर निवडून आले होते. वसईतील ख्रिश्चन समाजाचे एकगठ्ठा मतदान ठाकूर यांच्या विरोधात होत असे. पण या वेळी समाजात ठाकूर यांना काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे बोलले जाते.