इंदिरा गांधी, पवार यांच्या श्रेष्ठत्वाच्या मुद्दय़ावरून दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात श्रेष्ठ कोण, या वादातून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, रविवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांमध्येच फूट पडली. त्यातून राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीला जाण्याचे टाळले. दोन्ही काँग्रेसने या वादाबाबत सोयीस्कर मौन बाळगले असले तरी गौरवासाठी आपल्याच नेत्यांना प्राधान्य मिळावे, या संदर्भात दोन्ही बाजू आग्रही राहिल्याने तिढा कायम आहे. अधिवेशनाच्या अगोदरच विरोधकांमध्ये फूट पडल्याने भाजपची मंडळी खुशीत असून, हा वाद आणखी वाढेल याची पुरेशी खबरदारी घेतली जाईल, अशीच चिन्हे आहेत.

विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये येत्या ५ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी, दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, बाळासाहेब सावंत या दिवंगत नेत्यांबरोबरच शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांचाही गौरव करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. राजशिष्टाचारानुसार ठरावामध्ये इंदिरा गांधी यांचे नाव आधी येणे सयुक्तिक ठरते. पण विधान परिषदेत सदस्यसंख्या जास्त असलेल्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या नावाचा ठराव आधी घ्यावा, असा आग्रह धरला आहे. त्यातून दोन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. ‘लोकसत्ता’ने शनिवारीच यावर प्रकाश टाकला होता.

काँग्रेसने पवारांच्या नावाच्या ठरावाला संमती द्यावी, अन्यथा विरोधी पक्षांच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. ठरावात इंदिरा गांधी यांचे नाव असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी ही बाब दिल्लीपर्यंत नेली. राजशिष्टाचारानुसार इंदिरा गांधी यांच्या नावाचा ठराव आधी झाला पाहिजे, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना कळविल्याने राष्ट्रवादीच्या दबावाला राज्यातील नेते बळी पडले नाहीत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विरोधकांमधील फुटीबाबत काँग्रेसला जबाबदार धरले. ‘शरद पवार हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशा चार सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. याशिवाय ते ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधीच पराभूत झालेले नाहीत’, असे सांगत ते कसे श्रेष्ठ आहेत हे सांगण्याचा तटकरे यांनी प्रयत्न केला. इंदिरा गांधी या आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या, ही बाब येथे महत्त्वाची. पण विखे-पाटील यांच्याप्रमाणेच तटकरे यांनीही विरोधकांमधील फुटीबाबत थेट भाष्य करण्याचे टाळले.

‘राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची मते फुटली असली तरी काँग्रेसची मते फुटलेली नाहीत’, असे सांगत विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीकडे अंगुलिनिर्देश केला; तर तटकरे यांनी, ‘आमची सर्व ४० मते मीरा कुमार यांनाच मिळाली आहेत’, असा दावा करीत काँग्रेसची मते फुटल्याचे सूचित केले.