काँग्रेस- राष्ट्रवादीची मागणी
केंद्राने सहा सिलिंडर अनुदानाच्या रक्कमेत देण्याचा निर्णय घेतल्यावर राज्य सरकारने नऊ सिलिंडर सवलतीत देण्याचा निर्णय घेतला. आता केंद्राने ही संख्या नऊ केल्याने राज्य सरकारने १२ सिलिंडर सवलतीच्या दरात द्यावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे.
केंद्राने सहा सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतल्यावर काँग्रेसशासीत राज्यांना नऊ सिलिंडर्स सवलतीच्या दरात देण्याचा आदेश देण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या आदेशामुळे राज्यात एक लाखांपेक्षा वार्षिक कमी उत्पन्न असलेल्यांनाच फक्त तीन सिलिंडरची सवलत देण्याचा निर्णय घेतला. केंद्राने सिलिंडरची संख्या नऊ केल्यास राज्य सरकार ही सवलत देणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. आता केंद्राने ही मर्यादा नऊ केल्याने राज्याने १२ सिलिंडर्स सवलतीत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. मात्र, ही मर्यादा वाढविण्यास मुख्यमंत्री अनुकूल होणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.