रेल्वेमंत्रीपद महाराष्ट्राकडे आल्याने राज्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुरेश प्रभू यांच्याकडून अपेक्षा होत्या. प्रभू यांनी मात्र महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पीय भाषणात खंडाळा घाटाचा प्रभू यांनी उल्लेख केला, पण अर्थसंकल्पात राज्याला प्रत्यक्षात कात्रजचा घाट दाखविला आहे असा टोला ठाकरे यांनी लगावला.
 रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्राची निराशा केल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. खासगीकरणावर भर देण्यात आला आहे हा निर्णय कोणा उद्योगपतीच्या फायद्यासाठी नाही ना, असा सवाल उपस्थित केला. अदानीचा फायदा व्हावा म्हणून खासगी वीज खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, अशी शंकाही मलिक यांनी घेतली आहे. तर ‘प्रभू एक्स्प्रेस’ यार्डातच घसरल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.