शिवसेनाप्रमुखांचे स्मारकाच्या घोषणेनंतर महापालिकेतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या राजकीय पक्षांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानच अधिक योग्य असल्याचे मत दोन्ही कॉंग्रेसकडून व्यक्त करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी पालिकेच्या बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुखांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे, पण त्यासाठी महापौर बंगलाच का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे. महापौर निवासस्थानाऐवजी ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानीच स्मारक करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर महापौर बंगला ही ‘हेरिटेज वास्तू’ असून ती स्मारकासाठी देण्यात येऊ नये. राज्यात आणि पालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असल्याने त्यांना अन्यत्र भूखंड शोधता आला असता, अशी प्रतिक्रिया पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी व्यक्त केली आहे. पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, ‘भाजप’चे गटनेते मनोज कोटक यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. महापौर निवासस्थान हे महापालिकेच्या अखत्यारित येते. त्यामुळे पालिकेची सुधार समिती तसेच पालिका सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

स्मारक ‘मातोश्री’वर उभारा- विखे
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमध्ये वास्तव्य असलेला निवासस्थान राज्य सरकारने खरेदी केले. त्याच धर्तीवर, बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेला ‘मातोश्री’ बंगला खरेदी करून तेथेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून, मुंबईच्या महापौरांच्या निवासस्थानाला एक आगळेवेगळे स्थान आहे. महापौर निवासस्थानात बाळासाहेबांचे स्मारक करणे उचित ठरणार नाही. आयुष्य व्यतीत केलेल्या वास्तूमध्ये स्मारक करणे केव्हाही योग्य ठरेल. शिवसेनाप्रमुखांचे अनेक वर्षे वास्तव्य ‘मातोश्री’ मध्ये होते. यामुळेच ‘मातोश्री’ची जागा राज्य सरकारने खरेदी करावी व त्या जागेत शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक करावे, असा सल्लाही विखे-पाटील यांनी दिला आहे. लंडनमघध्ये डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले निवासस्थान सरकारने अलीकडेच खरेदी केले. या प्रमाणेच ‘मातोश्री’ खरेदी करण्यात काही अडचण उद्भवणार नाही, असेही मत विखे-पाटील यांनी मांडले आहे.