घरवापसी कार्यक्रम, धार्मिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न तसेच नथुराम गोडसेचे उदात्तीकरण यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात दुही निर्माण करण्याच्या भाजप आणि रा. स्व. संघाच्या विचारसरणीच्या विरोधात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर मुक आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळ धरणे धरण्यात येणार आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तर सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १२ या काळात पक्षाचे नेते धरणे धरणार आहेत. काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय एकता मंचच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे धरण्यात येणार आहे. यामध्ये निधर्मवादी पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.