आघाडीबाबत काँग्रेसने प्रथमच खंबीर भूमिका घेतली असली तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री तसेच बहुतांशी आमदार राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम राहावी या ठाम मताचे आहेत. राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींमध्येही हाच सूर ऐकायला येतो.
राष्ट्रवादीने निम्म्या जागांची मागणी करीत काँग्रेसवर दबाव वाढविला आहे. राष्ट्रवादीच्या हेतूबद्दल काँग्रेसमध्ये संशयाची भावना आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत आघाडीच्या विरोधात सूर होता. बहुतांशी नेत्यांनी राष्ट्रवादीची दादागिरी सहन करण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणी केली. आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीवर सोपविला आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी कायम ठेवण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ जागा स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसवर अटी लादत असल्यास आघाडीचा निर्णय दिल्लीतील पक्ष नेतृत्वानेच घ्यावा, असा सूरच राज्यातील सर्वच नेत्यांनी व्यक्त केला आहे. यानुसार आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आघाडीला विरोध असला तरी मुख्यमंत्री, बहुतांशी मंत्री आणि विद्यमान आमदार मात्र आघाडी कायम राहिली पाहिजे या मताचे आहेत. आधीच परिस्थिती फारशी चांगली नाही. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नसली तरी वातावरण तेवढे अनुकूल नाही. अशा वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढल्यास त्यातून विरोधकांचेच फावेल, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांची जवळपास हीच भावना आहे. वेगळे लढल्यास मतविभाजन होईल, असे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे.
आघाडी तुटलीच तर ती आपल्यामुळे तुटली याचे खापर फुटू नये, असा दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल काँग्रेसमध्ये अजूनही संशयाचे वातावरण आहे.
काँग्रेसमध्ये मतभेद
आघाडी कायम ठेवण्याबाबत काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहेत. आगामी निवडणूक ही आघाडीच्या माध्यमातून लढली पाहिजे यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भर आहे. वेगळे लढण्यासाठी वर्षभर आधी सारी तयारी करणे आवश्यक होते, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याचे समजते.