लोकसभेतील दारुण पराभवापासून काँग्रेसचे नेते पराभूत मानसिकतेतच होते. प्रचाराच्या काळातही पक्ष विस्कळीत होता. फार काही चांगल्या यशाची अपेक्षा नव्हती, तरीही राष्ट्रवादीपेक्षा एक जागा जास्त मिळाली यातच काँग्रेसचे नेते समाधान मानत आहेत. लोकसभेत दोन खासदार जास्त निवडून आले यावरून राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आणि जागावाटपात जास्त जागांची मागणी केली. नेमकी याच मुद्दय़ावर आघाडी तुटली. अंतिम आकडेवारीनुसार काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ उमेदवार निवडून आले. निकाल काहीही लागो, राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, अशीच काँग्रेसच्या मुख्यालयात उपस्थित नेत्यांची भावना होती. लोकसभेतील पराभवानंतर राज्यात नेतृत्व बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याची मागणी दिल्लीने फेटाळून लावली. चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेवर काँग्रेसने भर दिला होता. पण त्याचा फार काही फायदा झाला नाही. भाजप उमेदवारांच्या तुलनेत १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना आर्थिक आघाडीवर चणचण भासली.