काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीच्या पातळीवर घेतला जाणार असला तरी गतवेळच्या तुलनेत आठ ते दहापेक्षा जास्त जागा सोडण्यास राज्यातील काँग्रेस नेत्यांचा तीव्र विरोध आहे.
राष्ट्रवादीने निम्म्या जागांची केलेली मागणी काँग्रेसने फेटाळल्याने जागावाटपाची चर्चा मुंबईत करण्यापेक्षा नवी दिल्लीतच केली जावी, अशी भूमिका राष्ट्रवादीने शनिवारी मांडली. दिल्लीत चर्चा झाल्याशिवाय जास्त जागा मिळणार नाहीत याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना कल्पना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये यापूर्वी जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. गेल्याच आठवडय़ात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी केली जाणार असल्याने नक्की किती जागा देता येतील याबाबत पक्षाध्यक्षांनी आढावा घेतला होता.
आघाडीत २००४ मध्ये काँग्रेस १६२ तर राष्ट्रवादी १२४ असे जागावाटप झाले होते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या चांगल्या यशामुळे काँग्रेसने काहीशी कठोर भूमिका घेत जास्त जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. तेव्हा काँग्रेसने १७० तर राष्ट्रवादीने ११३ जागा लढविल्या होत्या. उर्वरित जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या होत्या. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत १४४ जागांची मागणी मान्य करणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. निम्म्या जागा सोडण्यात येणार नसल्या तरी दिल्लीच्या दबावामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांना काही जागा सोडाव्या लागतील, अशी चिन्हे आहेत.
काँग्रेसकडून १४४ जागा मिळण्याची शक्यता नसली तरी १३० ते १३२ पर्यंत जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादीला १२४ जागा सोडण्यात आल्या होत्या. तेवढय़ाच किंवा त्यापेक्षा एखादी जास्त जागा सोडण्यात यावी, असा काँग्रेस नेत्यांचा प्रस्ताव आहे. उभय पक्षांबरोबर गेली पाच वर्षे असलेल्या अपक्ष आमदारांना दोन्ही काँग्रेसने सामावून घ्यावे, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. दोन्ही पक्षांबरोबर असलेल्या अपक्षांना सामावून घ्यायचे झाल्यास १५ ते १८ जागांची आदलाबदल करावी लागेल. १३५ जागांच्या मागणीवर ठाम राहू, असे संकेत राष्ट्रवादीच्या गोटातून देण्यात आले आहेत. निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागा राष्ट्रवादीचे नेते हुशारीने पदरात पाडून घेतात, असा आजवरचा अनुभव आहे.
काँग्रेसने जास्त जागांची मागणी मान्य केली नाही म्हणून आघाडी तुटली हे खापर काँग्रेसवर फुटू नये, असा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. राष्ट्रवादी शेवटपर्यंत बरोबर राहीलच याची खात्री नसल्याने राष्ट्रवादीच्या साऱ्याच मागण्या मान्य करण्यास मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांबरोबरच राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांचाही विरोध आहे.