राज्यातील वाढते शहरीकरण आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत विचार करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ‘शहरी विकास विभागा’ची स्थापना केली आहे. नगरविकास तज्ज्ञांच्या अभ्यास गटाचा याबाबतचा अहवाल प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून त्याच्या अंमलबजावणीसाठी पक्षातर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
शिवेसेना, मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही शहरी भागात आपली ताकद वाढविण्यावर भर देत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसनेही शहरातील मतदरांना आपलेसे करण्यासाठी हा नवीन विभाग स्थापन केला आहे. या विभागाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री अ‍ॅड. बी. ए. देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागाच्या सल्लागार समितीत राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माजी महापालिका आयुक्त जे. जी. कांगा, जागतिक बँकेचे सल्लागार विद्याधर पाठक, सुलक्षणा महाजन आदींचा समावेश आहे.
राज्यातील ५ कोटी ८० लाख लोक शहरात राहतात. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे येथे मोठय़ा प्रमाणावर शहरीकरण झाले आहे. ही समिती या विभागातील पाणी, रस्ते, वाहतूक, निवारा आदी प्रश्नांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणार आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत, अशी माहिती बी. ए. देसाई आणि पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.